Friday, December 27, 2013

अरविंद केजरीवाल एक आम मुख्यमंत्री??...Arvind Kejriwal Angel of Aam People???? #aap, #AamAadmiParty #Arwindkejriwal

मुख्यमंत्री आम आदमीसाहेब सकाळी लौकर उठले. "आप'ल्या पक्षाचे हायकमांड "आप'णच आहो, हे गुलाबी वास्तव जाणवून तातडीने ते स्वत:च्याच तसबिरीशी जाऊन उभे राहिले! स्वत:च्याच तसबिरीला त्यांनी हार घातला. हात जोडले. मफलर गुंडाळला. "आम आदमी'ची टोपी चढवली. मग फक्‍त अर्ध्या बादलीत त्यांनी इतर आन्हिके उरकली... सातशे लिटर पाणी देण्याचे आश्‍वासन पूर्ण करीत नाही, तोवर अंघोळ करायची नाही, असा त्यांचा निर्धार असल्याने मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचारी अदबीने दूरच उभे राहिले होते! मग गल्लीतील टपरीवरून कटिंग गिलास मागवा, असे आमफर्मान त्यांनी सोडले. मुख्यमंत्री निवासस्थानातून लागलीच पोलिसांच्या दोन जिपा, तीन पांढऱ्या अंबासेडर गाड्या सायरन वाजवत निघाल्या. आमटपरीवरून आणलेल्या चहाच्या आमगिलासात दोन खारी बिस्कुटे बुडवून "आआ'साहेबांनी ती राजकीय चपळाईने मुखात सारली! एका टप्पोऱ्या भटरास चमच्याने भोक पाडून त्यांनी ते चहात डुबवून मऊ लुसलुशीत केले आणि तेही गिळंकृत केले. गिळतानाही "आ..म' अशी ढेकर दिली! 



आम आदमीसाहेबांना व्हीआयपी कल्चरची चीड आहे. मुख्यमंत्री झालो, तरी आपल्याशी "आम आदमी'प्रमाणे वागावे व बोलावे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यानुसार त्यांच्या आमपीएने त्यांना सांगितले, ""ओय यार, वो बिजली का झोल कब्ब ठीक करेगा, तू यार!! प्याज के दाम भी तो घटाने हॅ मेरे पुत्तर!! कांग्रेस और बीजेपीवालोंको तिहाड भेजनेवाली बात कही थी तुमने!!..कुछ करो!!'' 

उत्तरादाखल आआसाहेब तीनदा खोकले!! आआसाहेब व्हीआयपी नसल्याचेच हे सिंप्टम (पक्षी : लक्षण) आहे. त्यांना खोकला होतो. धनदांडगे व्हीआयपी लोक परदेशी परफ्युमे वापरतात. आआसाहेबांचे अस्तित्व "बाम'च्या वासाने दर्वळते! म्हणून दुष्ट, नतद्रष्ट, सत्तालोभी लोक त्यांना "बाम आदमी पार्टी' असे चिडवतात!!...काहीही न बोलता आआसाहेबांनी कोपऱ्यातील एक बरासा झाडू उचलला. 

त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम भरगच्च होता. वेळ न दवडता त्यांनी कामाला हात घातला. "दुपारी एक तास झोप घ्यावी की भोजनोत्तर भांडी घासावीत?' असा जटिल प्रश्‍न त्यांनी "फेसबुक'वर विचारला. त्याला अर्ध्या तासात दीड लाख "लाइक्‍स' आले. 67 टक्‍के लोकांनी "भांडी घासावीत' असा कौल दिला. तीस टक्‍के लोकांनी "झोप घ्यावी' असे सांगितले. तीन टक्‍के लोकांनी "झक मारा' असे उत्तर दिले. शेवटी आआसाहेबांनी दुसऱ्याच्याच घरी जेवण घेऊन घरी जाऊन झोप घेण्याचे ठरवले!! दुसऱ्याच्या घरी जेवल्याचा प्रमुख उपयोग म्हणजे भांडी घासण्याचा वेळ वाचतो व पाणीही वाचते. 

दुपारची आमकुक्षी (वामकुक्षीला आता आमकुक्षी असे म्हटले जाते...) आटोपून ते पुन्हा तीन वेळा खोकले. नाकपुड्या, कपाळ आदी प्रदेशात त्यांनी बाम लावला. पुन्हा "ट्विटर'वर त्यांनी टिवटिवले : "10, जनपथ येथे आमअहमद पटेलांकडे चर्चेसाठी जावे का?' त्यावर पुढील सत्तेचाळीस मिनिटांत एक लाख 80 हजार लोकांनी "गो' अशी प्रतिक्रिया दिली. 30 हजार लोकांनी "नो' असे सांगितले. 45 हजारांनी "घो' असे अगम्य उत्तर दिले!! शेवटी आआसाहेब स्वत: आमपीएच्या कार्यालयात गेले. ""क्‍या है? कल आना!'' असे आमपीएकडून त्यांनी वस्सकन अंगावर ओरडून घेतले. म्हणाले, ""मला आमअहमद पटेलांकडे जायचे आहे. गाडी तयार ठेवा, अशी विनंती करायला आलो आहे!'' 

कानात काडी घालून आमपीए आमतुच्छतेने म्हणाला, ""अब गाडीशाडी भूल जा, मेरे यारॉं!! ऑटो से चले जाना...ओए, भगवान तेरी रक्षा करता हॅ, इसलिए झेड सिक्‍युरिटी नही ली ना तुमने? अब भगवानही ऑटो दिलवाएगा तुम्हे...भाग. आया बडा गाडी मांगनेवाला!'' 

...माननीय मुख्यमंत्री आम आदमीसाहेबांना मग खोकल्याची जोरदार उबळ आली!